Please Share
गणपतीबाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया !!!!!
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ही १० दिवसांसाठी गणरायाचे आगमन होणार आहे. तेव्हा गणराया येणार म्हटल्यावर बच्चे कंपनीला सुट्टी, मज्जाच मज्जा.
अहो पण हि मुलं घरात असली कि कामाचा खोळंबा होतो. गणपतीची आरती त्यांनाच करायची असते. दिवा लावायचा असतो. अगरबत्ती लावायची असते. मोदक करायचे असतात. सारखी मध्ये मध्ये करत असतात. बर त्यांच्याकडे लक्ष नाही दिले तर आणखी काम वाढवून ठेवतात.
मग या मुलांना engage तरी कसे करायचे?
असा प्रश्न पालकांसमोर उद्भवतो.
चला तर आज याच विषयावर चर्चा करूया. जेणेकरून तुमचा गणेशोत्सव मुलांसोबत दणक्यात साजरा होईल.
गणपती हे सर्व हिंदूंचे आराध्य दैवत, तसेच ही बुद्धीची देवता. त्याने आपल्याला बुद्धी दिली नसती, तर आपण अभ्यास करूच शकलो नसतो. आपण मुलांना लहानपणापासून हेच सांगत असतो. त्यांना विविध माध्यमातून गणपती पूजन-अर्चन शिकवत असतो.
मुलांना गणपती हा अगदी जवळचा मित्र असल्यासारखे वाटते. तो त्यांना त्यांच्यातलाच एक वाटत असतो. त्यामुळे गणपती मध्ये छोट्या-छोट्या पद्धतीने मदत करायला त्यांना आवडते. पण आपण मोठी माणसे त्याच्या काळजी मुळे काही गोष्टी करण्यापासून त्यांना थांबवत असतो. आज आपण अशा काही लहान लहान कल्पनांचा वापर करून मुलांचा सक्रिय सहभाग घेऊन गणेश चतुर्थी आपल्या कुटुंबासाठी खास कशी बनवता येईल याचा विचार करूया .
आरास / मखर सजावट
गणपतीची आरास करायची असेल तर आपण बाजारातून मखर आणतो. आणि त्याच्या आजूबाजूला थोडी फार सजावट करून गणपती बसवतो. त्यासाठी देखील बाजारात उपलब्ध असलेल्या विविध सजावटींच्या वस्तूं जसे प्लास्टिकच्या फुलांच्या माळा, मोत्यांचा हार, थर्माकोल आणि पत्र्यांवर नक्षीकाम केलेले मखर, पाट, चौरंग यांचा वापर करतो. पण या ऐवजी जर आपण मुलांच्या मदतीने पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करून घरीच सजावट केली तर त्यांनाही मज्जा येईल आणि त्यांनाही या घरात महत्वाचे स्थान आहे असे वाटेल.
उत्सवाचे नियोजन.
बाप्पा येणार म्हणजे घराची सजावट कशी करायची? दारासमोर कोणती रांगोळी काढायची? रांगोळीत रंग कोणते भरायचे? पाहुण्यासाठी फराळ काय करायचे? सरबत कोणते बनवायचे? या सगळ्या गोष्टीचे नियोजन करण्याचे काम मुलांना द्या आणि बघा किती छान काम करतात मुले.
खरेदी
नियोजन नंतर वेळ येते ती खरेदीची. एक बजेट सांगा. मुलांना सांगा तू जे पाहिजे त्याची यादी कर. तेवढ्या पैशातच सर्व करायचे आहे. व्यवस्थित मॅनेज कर. त्यांच्यावर जबाबदारी टाका. मग मुलंच तुम्हाला काटकसर करायला सांगतील.
प्रसाद बनवताना घेता येणारी मदत.
गणपतीचे मोदक बनवणे हे देखील एक खूप महत्वाचे आणि आनंददायी काम असते. आणि मुलांना ते खुप आवडते. त्यामुळे मोदक करताना त्यांची मदत घ्या. मोदक मोजायला सांगा. आणखी किती मोदक करायचे आहेत ते विचारा म्हणजे मुले ती calculation करण्यात गुंतून जातील.
फुलांच्या माळा बनविणे आणि दुर्वा निवडणे.
गणपतीच्या आरतीच्या वेळी लागणाऱ्या फुलांच्या माळा बनविणे, दुर्वा निवडणे त्याचा २१ दुर्वांचा गुच्छ बनवणे. अशी कामे मुलांना द्या. आणि घरी कोणी पाहुणे आल्यास त्यांना आवर्जून हे सांगा. मुलांनाही रेकग्निशन दिल्यासारखे वाटेल. ती दुप्पट उत्साहाने काम करतील.
या छोट्या छोट्या कृतीमुळे होणारे फायदे खूप मोठे आहेत.
- सर्वांनी एकत्र काम केल्यामुळे communication Gap कमी होईल.
- आपल्याजवळ असलेली जागा, साहित्य, वेळ, आपली कार्यक्षमता, पैसे या सगळ्यागोष्टींचा विचार केल्यामुळे त्यांच्यातील क्रिटिकल थिंकिंग स्किल डेव्हलप होतील.
- नवनवीन कल्पना सुचतील त्यामुळे क्रीटीव्ह थिंकिंग करायची सवय लागेल.
- नियोजनाचे महत्व समजेल.
- यशस्वी झाले तर आत्मविश्वास वाढेल. आणि नाही जमलं तर तुम्ही मदत केल्यामुळे 'तुम्ही कायम सोबत आहात' हि भावना मनात रुजेल.
- स्वनिर्मितीचा आनंद मिळेल.
- जबाबदारी त्यांच्यावर दिल्याने त्याचीही जाणीव होईल.
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मुलांची हे सुट्टी तुम्ही देखील एन्जॉय कराल.
चला तर लागूया कामाला. मलाही माझ्या मुलाच्या मदतीने गणपती उत्सव दणक्यात साजरा करायचा आहे.
तुम्हाला सुचलेल्या आणखी काही युक्त्या असतील तर मला नक्की सांगा. 8879513587 या नंबरवर.
Bye.
Enjoy Ganpati Festival Vacation.
